मूळ पुरुष विठ्ठल शिवदेवांनंतर त्यांचे पुत्र शिवाजी विठ्ठल, त्यांचे बंधु खंडेराव विठ्ठल, त्यांचे पुत्र नृसिंह खंडेराव त्यांचे पुत्र विठ्ठल नृसिंह या सर्व विंचुरकर वंशजांनी श्रींच्या देवालयाचे बांधकाम चालूच ठेवले. शिवाय वरील पुरुष वेळोवेळी श्री क्षेत्री येऊन क्षेत्रनिवास, दानधर्म, अन्नसंतर्पण करीत. यांनी श्रीस बहुमोल अलंकारही अर्पिले. देवस्थानचे वैभव चढते वाढते ठेविले. या वैभवावर लक्षणार्थाने वाच्यार्थानेहि कळस चढविला. तो पुण्य श्लोक रघुनाथराव विंचुरकरांनी.

रघुनाथरावांचा काळ हा देवस्थानचाच काय पण नरसिंहपुराचाही ऐश्वर्याचा कळस होय. रघुनाथराव हे मूळ पुरुष विठ्ठल शिव्देवापासूनचे पंचम पुरुष होत. त्यांनी देवालयाचा, शिखराचा जीर्णोध्दार करवून, त्यावर कलश स्थापना करून सुवर्णध्वजही स्थापिला. रघुनाथरावांनी इच्छा दर्शविल्यावरून ग्रामस्थांनी त्यांना गावठाणातील जागा दिली. त्यावर त्यांनी स्वत:चा पेशवेपध्दतीचा वाडा बांधला.

विंचुरकरांच्या वाड्यातीळ देवघरांत प्रमुख स्थानी, चांदीच्या मुकूटावर स्थापिलेल्या श्रीनृसिंहाच्या चांदीच्या पादुका रघुनाथरावांनी स्थापना केल्या, त्यांचा इतिहास असा - श्री क्षेत्रीच्या प्रघातानुसार श्रीभक्त श्रीची पंचामृत पूजा करतात.

पूजा संपल्यानंतर पूजाधिकारी भक्तांस 'श्री लक्ष्मीनारसिंह: प्रसादोस्तु' नारळ प्रसाद देतात. शास्त्रमार्गाचा सखोल विचार करणार्‍या रघुनाथरावांच्या हे ध्यानी आले की, हा प्रसाद घेतांना सोवळ्यात असल्याने आपणास रिक्तशीर्षाने प्रसाद घ्यावा लागतो व ही गोष्ट शास्त्रमार्गास सोडून आहे.

शीर्षावर पगडी धारण करणे हे सोवळ्यामुळे अशक्यच. शीर्षावर मुकुट धारण करणे हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला. मुकुट धारण करण्याची पात्रता त्यांची निश्चितच होती. तथापि यांतहि एक अडचण त्यांना जाणवली. मुकुट धारण करून श्रीजवळ उभारण्यात श्रीचा उपमर्द होत होता. म्हणून मुकूटावर त्यांनी श्रींच्या पादुका स्थापित केल्या.

हा पादुकास्थापित मुकुट शीर्षावर धारण करून रघुनाथराव नारळ प्रसाद घेत. या मुकूटावर श्रीनृसिंहाचा मंत्रराज कोरविलेला असून पादुकांवर शंखचक्रपद्मादी शुभचिन्हे कोरविली आहेत. शीर्षी मुकुट धारण करणारे रघुनाथराव हे शेवटचे विंचुरकर व मुकूटावर पादुका स्थापन करणारे रघुनाथराव हे पहिलेच विंचुरकर होते.