श्रीनृसिंहाचा अवतार झाला तो मूलस्थान क्षेत्री, हे क्षेत्र मुलतान या नावाने आजही पाकिस्तानात आहे. हिरण्यकश्यपूची राजधानी तीच होती. त्याचा वधही तेथेच झाला. दुष्टय दैत्याचा वध व प्रल्हादासारख्या सज्जनाचे रक्षण करावयाचे म्ह‍णुन तर भगवान महाविष्णुनी श्रीनृसिंहरुपे चतुर्थावतार घेतला.

हिरण्यकश्यपूचा वध करण्यापुर्वीची ही एक नृसिंहक्षेत्राची कथा आहे. हे स्थान नीरानृसिंहक्षेत्र या नावाने प्रसिध्द असुन पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्याच्या आग्नेय दिशेचे हे शेवटचे अग्र. क्षेत्राच्या एका बाजुने नीरा नदी, दुसर्‍या बाजूने भीमानदी व तिसर्‍या बाजूस या उभयतांचा संगम, तीन्ही बाजूंनी पाणी व एका बाजूस जमीन असे रमणीय स्थान. या क्षेत्राचा आकार सिंहाच्या नखासारखा आहे.

येथील श्रीनृसिंह हा महाराष्ट्र, म्हैसूर आणि मध्यप्रदेश या राज्यातील अनेक नृसिंहभक्तांचा कुलस्वामी आहे. या सर्व भक्तांचे श्रीनृसिंह हे अधिष्ठान आहे. विजयनगरच्या सिंहासनाचे कुलदैवत नृसिंह हे होते. नीरानृसिंहपुर या क्षेत्राचा समावेश विजयनगरच्या हिंदु साम्राज्यात होता. श्रीनृसिंह हे विजयनगरच्या राजघराण्याहचे उपास्य दैवत असल्याने या स्था‍नाचा या सम्राटाकडुन अतीव आदर राखला जात असे.

नीरा नरसिंहपूर हे पृथ्वीचे नाभिस्थान आहे हे एक भूवैज्ञानिक सत्य आहे. नीरा-नरसिंहपुरापासुन सुमारे दहा मैलांवर भिवरवांगी नावाचे गांव आहे. भीमेच्या काठावरच्या त्या गावची पाहणी भारत सरकारच्या भूगर्भशास्त्रज्ञांच्या तुकडीने केली. त्यांनी प्रकट केलेल्या शास्त्रीय निष्कर्षा नुसार भिवरवांगी हा पृथ्वी्चा केंद्रबिंदु आहे तर नीरा-नरसिंहपूर हे पृथ्वीचे नाभिस्थान आहे.